भुसावळातील नवमहाराष्ट्र स्टोअर्सचे संचालक ललित नेमाडे दुचाकी अपघातात ठार

भुसावळ : हरताळा येथे देवदर्शनासाठी निघालेल्या भुसावळातील दाम्पत्याच्या दुचाकीला वरणगावजवळ राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. ललित प्रभाकर नेमाडे (भुसावळ) असे मयताचे नाव आहे. नेमाडे हे भुसावळातील नवमहाराष्ट्र स्टोअर्सचे संचालक आहेत.

अपघाताचे नेमके कारण अस्पष्ट

भुसावळातील नवमहाराष्ट्र स्टोअर्सचे संचालक ललित प्रभाकर नेमाडे हे आपल्या पत्नीसह शुक्रवारी हरताळा येथे देवदर्शनासाठी जात असताना वरणगाव बायपासवरून जाणाऱ्या महामार्गावरील डिव्हायडरवर त्यांची दुचाकी आदळल्याने ललित प्रभाकर नेमाडे (48, भुसावळ) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी जखमी झाल्याचे सांगण्यात आले मात्र प्रत्यक्षात नेमका अपघात कसा झाला याची अद्याप स्पष्टता नाही. अपघाताची माहिती कळताच सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव पोलिसांनी धाव घेत सौ. नेमाडे यांना उपचारार्थ हलवले तर ललित नेमाडे यांचा मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला आहे. सहा. निरीक्षक अडसुळ हे नेमाडे यांच्याकडून अपघाताची माहिती जाणून घेत आहेत.