लालूप्रसाद व शरद यादव आज भेटणार

0

मुंबई – बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि लोकतांत्रिक जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांची आज मुंबईत भेट होणार आहे. सायंकाळी ५ वाजता शरद यादव हे लालुंची रुग्णालयात भेट घेणार आहेत. या दोघांच्या भेटीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे मागील काही दिवसांपासून वांद्रे पूर्व येथील एशियन हार्ट रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शरद यादव नुकतेच मुंबईत पोहोचले आहेत. सायंकाळी ५ वाजता ते लालुंची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान बिहार आणि देशातील बदलत्या राजकीय समीकरणांवर चर्चा होण्याची शक्यता असल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

शरद यादव यांनी नितीशकुमार यांची साथ सोडून आपला नवा ‘लोकतांत्रिक जनता दल’ हा पक्ष स्थापन केल्यानंतर या दोन यादवांची राज्याच्या बाहेर होणारी ही पहिलीच भेट आहे. त्यामुळे लालू यांच्या तब्येतीची विचारपूस हा विषय जरी महत्त्वाचा असला, तरी या निमित्ताने दोन यादवांमध्ये नेमकी काय चर्चा होणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. या भेटीदरम्यान शरद यादव यांच्यासोबत शिक्षक आमदार कपिल पाटील आणि महत्त्वाचे काही पदाधिकारी सोबत असणार आहेत.