बिहार: सध्या तुरुंगात असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी नेते लालू प्रसाद यादव यांना आयकर विभागाने दणका दिला आहे. लालू यादव यांची तब्बल ३.७ कोटींची बेहिशेबी संपत्ती जप्त करण्यात येणार आहे. यात पाटण्यातील काही घरांचाही समावेश आहे. पाटण्याच्या जयप्रकाश नारायण विमानतळाजवळ लालू यादवांच्या मालकीच्या काही इमारती आहेत. या इमारतींची मालकी बेकायदेशीर असल्याचा ठपका आयकर विभागाने ठेवला आहे. त्यामुळे या इमारती जप्त करण्यात येणार आहेत. तसेच बिहार आवामी कोऑपरेटिव्ह बँकमधील लालू प्रसाद यादवांच्या कोट्यावधींच्या ठेवीही जप्त करण्यात येणार आहेत.
लालू यादवांची संपत्ती जप्त होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही मोठ्या प्रमाणात त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. दिल्लीतील बंगले आणि शेल कंपन्याही यावर्षी जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान लालू प्रसाद यांचे पुत्र आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी त्यांच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्र्यांना देण्यात येणाऱ्या सरकारी बंगल्यात तब्बल ४४ एसी लावल्याचा आरोप भाजप नेते सुशील मोदी यांनी केला आहे. ४४ एसी लावत सामान्य जनतेच्या पैशाचा अपव्यय केल्याचा आरोप सुशील मोदी यांनी केला आहे. फक्त ४४ एसीच नाही तर ५९ लाखांचं फर्निचरही सरकारी खर्चाने विकत घेतल्याचंही सुशील मोदींनी सांगितले आहे. जेडीयू, आरजेडी आणि काँग्रेस सत्तेत असताना देशरत्न मार्गावरील उपमुख्यमंत्र्यांसाठी राखीव बंगला तेजस्वी यादव यांना देण्यात आला होता. या बंगल्यात आता भाजपचे नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुशील मोदी वास्तव्य करत आहेत.