महापालिकेच्या कोकीळ जलतरण तलावावरुन 28 हजारांचा ऐवज लंपास

0

एमआयडीसी पोलिसात गुन्हा ः संशयित ताब्यात 60 मीटर वायर हस्तगत

जळगाव : महापालिकेच्या कोकीळ गुरुजी जलतरण तलावाच्या फिल्टर प्लॅटंमधून अज्ञात चोरट्याने सुमारे 24 हजार रूपये किंमतीची वायर तसेच 4 हजार रुपये किमतीचे कॅपीसीटर असा 28 हजाराचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी टिपू उर्फ बहिर्‍या सलीम शेख (वय-25) रा. बिस्मिल्ला चौक, तांबापूर याला ताब्यात घेतले असून वायर हस्तगत करण्यात आली आहे.

शहरातील प्लॉट नं. 36 पोलन पेठ शिवीजी रोड येथे नरेश चंद्रकांत भोसले (23) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते कोकीळ गुरूजी जलतरण तलाव शिवाजी उद्यानजवळ मेहरूण येथे मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. हा स्विमींग टॅँक मनपाचा मालकीचा असून तो एस.जी.एन.चे सपन झुनझुनवाला यांनी करारावर चालविण्यासाठी घेतला आहे. या स्विमींग टॅँकमध्ये भोसले यांच्यासोबत गिरीश कमलकिशोर सलामपुरीया, राहुल सुर्यभान अभंगे, प्रशांत अनिल घुगे असे कामाला आहेत. या स्विमींग टॅँकमध्ये लागणारे साहित्य इलेक्ट्रीक पाण्याची मोटार, वायरींग , कॅपेसिटर व इतर किरकोळ सामान ठेवण्यात आले आहे.

मोटार चालू होत नसल्याने प्रकार उघड

30 रोजी सकाळी 06 वाजता नेहमीप्रमाणे कर्मचारी कामावर आले. त्यावेळी प्लांटचे फिल्टर मोटर चालू होत नव्हती. मोटरीच्या वायर कापलेल्या दिसल्या. त्यामुळे मोटार चालू होत नसल्याचा प्रकार लक्षात आला. या ठिकाणी बर्‍यासशा कॉपरच्या वायरी या कापलेल्या दिसल्या होत्या. सर्व कर्मचार्‍यांना बोलवून या प्रकाराबददल विचारणा केली असता या बददल काही एक माहिती नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. अज्ञात व्यक्तीने वायर चोरून नेल्याची खात्री झाल्यानंतर या प्रकरणी 24 हजार रूपये किंमतीच्या कॉपरची वायर 20 अ‍ॅम्पीयर ची सुमारे 60 मीटर वायर तसेच 04 हजार किंमतीचे कॅपीसीटर असा एकुण 28 हजाराचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच एमआयडीसी पोलिसांनी संशयित टिपू उर्फ बहिर्‍या सलीम शेख (वय-25) रा. बिस्मिल्ला चौक, तांबापूर याला ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातील वायर हस्तगत करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.