नागपूर : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची आर्थिक प्रकरणात दोन वर्षांनी जामिनावर सुटका झाल्यानंतर, त्यांच्यावर केईएममध्ये उपचार सुरु आहेत. आता तिथून बाहेर पडल्यानंतर भुजबळ थेट मैदानातच उतरणार आहेत. पुण्यात 10 जून रोजी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप होणार आहेत. या समारोपाच्या कार्यक्रमात छगन भुजबळ हे भाषण करणार आहेत.
तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर छगन भुजबळ यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक आहेत. काही कार्यकर्त्यांनी केईएम हॉस्पिटलमध्ये जाऊन भुजबळांची भेट घेतली. मात्र सर्वसमान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी भुजबळ समोर कधी येतील, याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र आता हल्लाबोल यात्रेच्या समारोपाच्या सभेतच भुजबळ भाषण करतील, हे निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेते म्हणून छगन भुजबळ यांना ओळखले जाते.
भुजबळ यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची धुराही सांभाळली आहे. भुजबळ गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात होते, त्यामुळे भुजबळांसारखा धडाडीचा नेता पक्षापासून काही काळ दूर होता. आता जामीन मिळाल्याने भुजबळ पुन्हा राजकीय मैदानात उतरणार आहेत. मात्र त्यासाठी अजून महिनाभर वाट पाहावी लागणार आहे.