पुणे :- जागतिक हास्य दिनानिमित्त विविध हास्यप्रकार सादर करीत बच्चे कंपनीने पोटभरून हसण्याचा आनंद लुटला. व्हॉटस् अॅपवरील स्माईलींची रांगोळी पाहून त्याप्रमाणे खळखळून हसणारी मुले… चार्ली-चॅप्लिन, लाल गोंड्याची टोपी घातलेला जोकर पाहून त्यांच्याबरोबर फोटो काढणारे ज्येष्ठ आणि चेह-यावर हास्यछटा साकारुन सोशल मीडियावर नाही, तर ख-या आयुष्यात खरे हसा पोटभर हसा असा संदेश यावेळी त्यांनी दिला.
जागतिक हास्यदिनानिमित्त कसबा पेठेतील मनपा शाळा व दादोजी कोंडदेव शाळेत विधायक मित्र मंडळ आणि बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे ”खरे हसा पोटभर हसा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी एकपात्री विनोदी कलाकार अरुण पटवर्धन, शाहीर हेमंत मावळे, संदीप लचके, विधायक मंडळाचे अध्यक्ष अभिषेक मारणे, अप्पा वनकर, सागर घम, विकास महामुनी, धनश्री लोणकर, वसुधा वडके, अनघा दिवाणजी, अनिल दिवाणजी, उमेश सकपाळ, पीयुष शहा, गौरव आहेर आदी उपस्थित होते. यावेळी अमर लांडे आणि रंगावली कलाकारांनी व्हॉटस् अॅपवरील वेगवेगळ्या स्माईलीची रंगावली साकारली. कसबा संस्कार केंद्रातील मुलांनी उपक्रमात मोठया संख्येने सहभाग घेतला.