जळगाव। सरकारी निरीक्षणगृहातून वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यावर बाहेर पडणार्या भवितव्याची हमी देणारा कायदाच भारतात नाही. या मुला-मुलींचे पुढे काय होते, याची पर्वा सरकारही करीत नसेल तर त्यांच्या नागरिकत्वाला अर्थच नाही, असे म्हणायचे का?, असा सवाल करीत अमरावती जिल्ह्यातील वझ्झरच्या स्व. अंबादासपंत वैद्य बेवारस, मतिमंद, मुकबधिर बालगृहाचे प्रमुख शंकरबाबा पापळकर यांनी बेवारसांना तहहयात आश्रय देणारा कायदा हवा म्हणून आमच्या पाठपुराव्याला माध्यमांनी साथ देण्याचे आवाहन जळगावात आज केले.
संपादकांशी वार्तालाप
जळगावच्या रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, जैन महिला मंडळ व नवयुवक मंडळाच्या सहकार्याने त्यांच्या बालगृहातील त्यांची मानसकन्या कु मंगल (प्रज्ञाचक्षु) ही रावेरचे देवीदास जैन यांचे चिरंजीव योगेश (गतीमंद) यांच्याशी 30 एप्रिलरोजी विवाहबध्द होणार आहे. यानिमित्त येथील वर्तमानपत्रांच्या संपादकांशी चर्चा करताना त्यांनी हे आवाहन केले. हा त्यांच्या 20 व्या मानसकन्येचा विवाह होणार आहे.मायादेवीनगरातील रोटरी भवनात हा विवाहसोहळा आयोजित करण्यात आला आहे. या विवाह सोहळ्यात मंगलचे मामा म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, महापौर नितीन लढ्ढा, पोलिस अधीक्षक जालींदर सुपेकर, काका म्हणून माजीमंत्री सुरेशदादा जैन, रमेशदादा जैन सहभागी होणार आहेत. कु. मंगलचे कन्यादान जलसंपदामंत्री गिरीश महाजन करणार आहेत.