मुंबई: विधानसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीत मोठी फुट पडलि असून, लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे लोक घुसले असून वंचित बहुजन आघाडी आता वंचितांचा राहिला नाही असा आरोप करत बाहेर पडले होते. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
सांगलीतून वंचितचे लोकसभेसाठी उभे राहिलेले गोपीचंद पडळकर हे आरएसएसचे कार्यकर्ते आहेत. त्यांना प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारी दिली. आमचे मत न घेताच त्यांनी पडळकर यांना पक्षाचे प्रवक्ते केले, असा आरोप माने यांनी केला. आंबेडकर यांना आम्हीच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष केले, मात्र त्याच्या कामाची पद्धत चुकीची असल्याने आपण त्यांच्यापासून दूर होत असल्याचे माने यांनी स्पष्ट केले.
आपण वंचित बहुजन आघाडी प्रवक्तेपदाचा राजीनामा आंबेडकर यांच्याकडे सोपवला असून आपण आंबेडकरांबरोबर काम करू शकत नाही, असा उल्लेख असलेले पत्र आंबेडकर यांना पाठवल्याचे माने म्हणाले. वंचितचे बहुसंख्य कार्यकर्ते आपल्या बरोबर असल्याचा दावाही माने यांनी केला आहे. दरम्यान माने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हस्तक असल्याचा थेट आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. माने यांचे म्हणणे स्वीकारण्याजोगे नसून त्यांचे दुखणे काही वेगळेच आहे असे पडळकर म्हणाले.