जलवाहिनीला गळती; आठ दिवसाआड पाणीपुरवठा

0

भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथे नगरपरीषदेच्या माध्यमातून तापी नदीपात्रातील पाण्याचा जलशुद्धीकरण केंद्राद्वारे शहरवासीयांना पाणीपुरवठा केला जातो मात्र तापी नदीपात्रात मुबलक पाणीपुरवठा असूनही शहरवासीयांना आठ दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याने ऐन सणासुदीत नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. आठ दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक करून ठेवावी लागत असल्याने डेंग्युच्या डासांची उत्पत्ती वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

मुबलक पाण्यासाठी आठ दिवसांची प्रतीक्षा

वरणगाव, कठोरे खुर्द, कठोरे बुद्रुक, अंजनसोंडे व फुलगाव अशा पाच गावांच्या सामूहिक पाणीपुरवठा योजनेवरून वरणगाव शहराला पाणीपुरवठा केला जात होता मात्र शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे योजनेवरील पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने नागरीकांना अडचणीचा सामना करावा लागत होता. याची दखल घेवून नगराध्यक्ष सुनील काळे यांनी तत्कालीन ग्रामपंचायतीच्या कालावधीत नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजूरी मिळवून योजना कार्यान्वित केली आहे. यामुळे शहरवासीयांना मुबलक पाणी मिळत असलेतरी नागरीकांना मुबलक पाण्यासाठी आठ दिवसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. शहराला कठोरे लगतच्या तापी नदीपात्रातून पाण्याचा उपसा करून शहरातील जलशुद्धीकरण केंद्राद्वारे टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा केला जातो मात्र तापी नदीपात्रात मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा असूनही शहरातील नागरीकांना आठ दिवसानंतर पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरीकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आठ दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांना मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा करून ठेवावा लागत आहे.तर साठवणूक केलेल्या पाण्यामुळे डेंग्युच्या डासांचीही भीती वाढली आहे. नगरपरीषदेच्या माध्यमातून किमान दोन-तीन दिवसानंतर पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी होत आहे.

उन्हाळ्यातही निर्माण झाली होती टंचाई

उन्हाळ्यात तापी नदीपात्रातील पाण्याचा साठा कमी झाल्याने पाण्याचा उपसा करणे कठीण झाले होते परीणामी शहरवासीयांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत होते. यामुळे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी पुढाकार घेवून नदीपात्रात ट्युबवरील वीज पंप बसवून शहराला पाणीटंचाईतून मुक्त केले होते मात्र आता मुबलक प्रमाणात साठा असून आठ दिवसानंतर होणार्‍या पाणीपुरवठ्यामूळे पावसाळ्यात नागरीकांवर अडचणींचा सामना करण्याची वेळ आली आहे. यावर नगरपरीषदेच्या माध्यमातून उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याची मागणी नागरीकांमधून होत आहे.

साथीचे आजार पसरण्याची भीती

शहर आणि परीसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या पाण्याची रीपरीप सुरू असल्याने बहुतांश ठिकाणी पाण्याचे डबके साचले आहेत. परीणामी डासांचा उपद्रव वाढून साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे नगरपरीषदेने पुढाकार घेवून डास निर्मूलन मोहिम हाती घेणे गरजेचे झाले आहे.तसेच डेंग्युच्या डासांची उत्पत्ती होणार नाही याकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे असून आरोग्य विभागाच्या माध्यमातून शहरात सर्व्हेक्षण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

अवैध नळ जोडणीची व्हावी तपासणी

शहरातील बहुतांश भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांना वीज पंपाचा वापर करावा लागतो. यामुळे त्यांच्यावर वीज बिलाचाही अतिरीक्त भार पडत असल्याने उच्च दाबाने पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी त्रस्त असलेल्या नागरीकांमधुन होत आहे तसेच शहराच्या बहुतांश भागात काही पदाधिकार्‍यांनी आपल्या राजकीय बळाचा वापर करून आपल्या मर्जीतील नागरीकांना दुहेरी नळ जोडणी दिली आहे. याचाही परीणाम पाणीपुरवठ्यावर होत असल्याने अवैधरीत्या देण्यात आलेल्या नळ जोडणीचा मुख्याधिकार्‍यांनी पथकामार्फत शोध घेवून अवैध नळ जोडणी बंद करणे आवश्यक असल्याची मागणीही नागरीकांमधून होत आहे.

जलवाहिनीला लागली होती गळती

वरणगाव शहराला पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिनीला बसस्थानक चौकात गळती लागली होती. लागलेली गळती दुरूस्त करण्याच्या कामामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता मात्र आता सर्वच भागात पुर्ववत पाणीपुरवठा सुरू होणार असल्याचे न.प.चे गणेश चाटे यांनी सांगितले.