मुंबईः राज्यात नुकतेच विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. निकालात अनेकांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. राज्यातील हाय व्होल्टेज विधानसभा मतदारसंघ असलेल्या परळी विधानसभा मतदार संघात अखेर भावाने बाजी मारली. राष्ट्रवादीचे नेते आणि उमेदवार धनंजय मुंडे पंकजा मुंडेंचा पराभव करत जायंट किलर ठरले. आपल्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकत आपला पराभव का झाला याचे चिंतन करणार असल्याचे म्हटले आहे. आता या विषयाला सर्वांनी विराम द्यावा..कोणी कोणावर आरोप करू नये, जबाबदारी ढकलू नये, निवांत आपली दिवाळी कुटुंबा समवेत साजरी करावी असे लिहले आहे.
पुढे त्यांनी लिहिले आहे की, राजकारणात सर्वेसर्वा असतात मतदार, त्यांचा निर्णय अंतिम असतो. तो योग्य का अयोग्य यात चर्चा नसतेच. तो अंतिम असतो बस्स!!, ज्यांनी मतदान केलेलं असतं त्या लोकांसाठी तो निर्णय योग्यच असतो!!!, मी माझ्या प्रचाराच्या शेवटच्या सभेत स्पष्ट केलं होतं “मला मुक्त करा किंवा स्वतः मुक्त व्हा”. या राजकारणात मी यशस्वी होणं हाही पराभव आहे, असंही मला वाटत राहिलं. 19 ऑक्टोबरला 6 वाजता प्रचार संपला, नंतर मी घरी गेले ते सरळ मतदानासाठीच 21 तारखेला सकाळी बाहेर पडले.
माझ्या निवडणुकीत ऐन महत्वाच्या दिवशीच मी घरी बसून राहिले. गोपीनाथ गड येथे मध्ये साहेबांचे दर्शन घेतले आणि थेट मतदानाच्या सकाळीच बाहेर पडले. मला मतं मिळाली नसतीलही, मला मन जिंकताही आली नसतील, पण एक मात्र नक्की आहे ,असत्य मला वागता आलं नाही हे शत्रूही कबूल करेल. या पोस्टच्या खाली येणारे ट्रोल विरोधक जाहीरपणे नाही, पण एकांतात मान्यच करतील ताईना खोटं नाही जमलं…विश्वास ठेवा मी ‘त्या ‘क्लीप मधील वाक्याने जी घायाळ झाले ते उठलेच नाही. मी सर्व प्रहार आणि संघर्ष भोगले पण हा वार जिव्हारी लागला आणि ते जर बनावट असतं तर मी काही प्रभावित नसते झाले हेही नक्की, असे त्यांनी म्हटले आहे.