मुंबई : मागच्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ८ रोजी धरणफुटीमुळे बाधित झालेल्या कुटुंबियांची भेट घेवून झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी पवार यांनी स्थानिक ग्रामस्थांचे सांत्वन करत त्यांच्या सोबत संवाद साधला. धरण प्रश्नी सत्य परिस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अवगत करण्यासाठी पवारांनी पत्र लिहिले आहे.

आपल्या पत्रात पवार यांनी २३ जण मृत्यूमुखी पडले असून, गावातील घरे पूर्ण नष्ट झाली आहे. पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. रस्ते, पूल, विद्युतव्यवस्था, व इतर सुविधांचा समावेश आहे. गावात पाणीपुरवठा टँकरने सुरु आहे. पिके वाहून गेली नाहीत, तर शेतजमीनही वाहून गेली आहे. मृतांच्या अपत्यांचा व तरुणांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री निधी, पंतप्रधान निधी व राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून अनुदान वितरित व्हावे, पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेच्या वेळी तत्कालीन सरकारने तातडीने मदतकार्य सुरू केले होते. मुख्यमंत्री निधी, पंतप्रधान निधी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधी व इतर मार्गाने मदत बाधित कुटुंबांपर्यंत पोहचवली. त्याच धर्तीवर तिवरे गावातील ग्रामस्थांचा व बाधितांचा विचार व्हावा, यासह अनेक बाबी नमूद केल्या आहेत.