पत्नीचा खून करणार्या पतीला जन्मठेप, मुलांनी दिली साक्ष
जळगाव | प्रतिनिधी
नांदायला येत नाही म्हणून मुलांसमोर पत्नीचा कोयत्याने खून करणार्या चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील 50 वर्षीय पतीला कोर्टाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. युवराज कपुरचंद जाधव (वय 50) याने 16 जून 2020 च्या रात्री 2 वाजता माहेरी राहणारी पत्नी कविता (वय 45) हिला लोखंडी कोयत्याने गळ्यावर वार करून ठार मारले होते. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता. या खटल्याचे कामकाज जिल्हा न्यायाधीश-3 बी. एस. वावरे यांच्या न्यायालयात चालले. खटल्यात एकूण 12 जणांच्या साक्षी तपासल्या. न्यायालयाने आरोपीला सोमवारीच दोषी ठरविले होते. शिक्षेबाबत गुरुवारी सुनावणी झाली. भादंवि कलम 302 खाली आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैदेची शिक्षा कोर्टाने सुनावली.
दरम्यान, आरोपी 27 जून 2020 पासून कारागृहातच आहे. त्यामुळे तेव्हापासून शिक्षेचा कालावधीचा विचार करण्यात येईल, असे न्यायालयाने नमूद केले आहे. या खटल्यात सरकारतर्फे अॅड. पंढरीनाथ चौधरी यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी तुषार मिस्त्री यांनी सहकार्य केले. मृत व आरोपीचा मुलगा धीरज व मुलगी मयूरी यांच्या साक्षी प्रत्यक्षदर्शी म्हणून महत्वाच्या ठरल्या. मयुरी हिने सांगितले की, आईचा हात अंगावर पडल्याने तिला जाग आली. डोळे उघडले असता आरोपी आईच्या छातीवर बसुन कोयत्याने वार करून गळा चिरत होता. या साक्षीला धीरज याची पुष्टी मिळाली.