वॉशिंग्टन : वर्णद्वेशातून अमेरिकेमध्ये भारतीय इंजिनिअर श्रीनिवासन कुचीभोतला यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमेरिकेच्या नौदलातून सेवानिवृत्त झालेला 52 वर्षी अॅडम प्युरिन्टनला 14 महिन्यात शिक्षा ठोठावण्यात आली.
मूळचा हैदराबादचा असलेल्या 32 वर्षीय श्रीनिवासवर ‘माझ्या देशातून चालता हो’ असं ओरडत अॅडम प्युरिन्टनने 22 फेब्रुवारी 2017 रोजी गोळ्या झाडल्या होत्या. कॅन्सास शहरातल्या ऑस्टिन बार अँड ग्रीलमध्ये ही घटना घडली होती. अॅडम प्युरिन्टनला मिसूरी राज्यातून अटक करण्यात आली होती.
अॅडम प्युरिन्टनने याच वर्षी मार्चमध्ये कुचीभोतलाच्या हत्येचा गुन्हा कबूल केला होता. कुचीभोतलाच्या हत्येसह त्याचा मित्र आलोक मदासनी आणि जवळच उभ्या असलेल्या व्यक्तीची हत्या करण्याच्या प्रयत्नात अॅडम प्युरिन्टनला दोषी ठरविले होते.
श्रीनिवास कुचीभोतलावर गोळ्या झाडल्यानंतर प्युरिन्टनने तिथून पळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर श्रीनिवासचे मित्र आलोक आणि आणखी एकाने पाठलाग केल्याने प्युरिन्टनने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. कॅन्सास सिटीच्या एका न्यायालयाने प्युरिन्टनला कुचीभोतलाच्या हत्येसाठी जन्मठेप आणि इतर लोकांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी 165 महिन्यांनी शिक्षा सुनावली.