वीज बिलाच्या धसक्याने एकाची आत्महत्या; महावितरणचा भोंगळ कारभार उठला जीवावर

0

औरंगाबाद : महावितरणने 8 लाख 65 हजारांचे वीज बिल पाठवल्याने, त्याचा धसका घेत औरंगाबादमधील एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जगन्नाथ शेळके असे या व्यक्तीचे नाव आहे. औरंगाबाद शहरातील भारतनगर भागात राहणाऱ्या जगन्नाथ शेळके यांना महावितरणने 8 लाख 65 हजार रुपयांचं वीज बिल पाठवलं. या बिलाचा धसका घेत जगन्नाथ शेळके यांनी टोकाचं पाऊल उचललं.

साडेआठ लाखाचे वीजबिल

जगन्नाथ शेळके यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. शेळके यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली. “वीज बिल जास्त आल्यामुळेच आपण हे पाऊल उचलत आहोत.”, असे शेळके यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. सुसाईड नोट अंगावर चिटकवून शेळकेंनी गळफास घेतला. दरम्यान, जगन्नाथ शेळके यांच्या आत्महत्या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

बिलिंग क्लार्क निलंबित
मीटर बदलल्याने एफआर (फायनल रीडिंग) नवीन मीटरमध्ये फीड करताना महावितरणची चूक झाली. 6177.8 ऐवजी 61178 झाले म्हणून चुकीचे बिल गेले. 3000 रुपयांचं बिल जाण्याऐवजी 8 लाख 65 हजारांचे बिल दिले गेले. या प्रकरणी बिलिंग क्लर्क सुशील कोळी यांचं निलंबन करण्यात आले आहे. असे एखाद्याला वाढीव बिल आले, तर ते वाटप केले जात नाही, पण ते चुकीने वाटप झाले, असे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले.