मुंबई : विधानपरिषदेच्या चार जागासाठी झालेल्या निवडणुकीत नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किशोर दराडे विजयाच्या जवळ आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे निरंजन डावखरे आघाडीवर आहेत. विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेने अशीच दणदणीत कामगिरी बजावली होती. त्या विजयानंतर आता पुन्हा शिवसेनेने भाजपला आणि अन्य पक्षांना चांगलाच दणका दिला आहे.
मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ असे चार प्रतिनिधी निवडले जाणार होते. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपकडून निरंजन डावखरे यांनी निवडणूक लढवली. काही महिन्यापूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. कोकण पदवीधर मतदारसंघातून त्यांनी यापूर्वी विजय मिळवला होता. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेन विद्यमान मंत्री दीपक सावंत यांना वगळून जुने जाणते कार्यकर्ते विलास पोतनीस यांना संधी दिली होती.