LIVE: कॉंग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था बुद्धू मुलांसारखी : मुख्यमंत्री

0

जळगाव: विरोधी पक्षाची भूमिका पाच वर्षात कॉंग्रेस-राष्ट्रवादीने निभावली नाही. म्हणून जनता कॉंग्रेस-राष्ट्रवादीला नाकारत आहे. मात्र ते इव्हीएमला दोष देतात. कॉंग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था बुद्धू मुलासारखी झाली आहे असा टोला मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला लगावला. आम्ही जनतेपर्यंत जातो आहोत आणि विरोधक इव्हीएमला दोष देत आहे. इव्हीएम ही मशीन आहे, जनतेच्या मनात घर करा तरच मत मिळेल असाही टोला मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी- कॉंग्रेसला लगावला. भाजपच्या महाजानादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. सागर पार्क येथील मैदानावर त्यांची सभा सुरु झाली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले.

विविध पक्षातून नेते भाजपात येत आहे, यावर शरद पवार टीका करतात. भाजपमध्ये मेगा भरती सुरु असल्याचे ते म्हणतात. त्यावर लक्ष देण्यापेक्षा तुमच्या पक्षाला गळती का लागली याकडे लक्ष द्यावे असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिला.

यात्रा ही देवासाठी काढली जाते त्यामुळे लोकशाहीमध्ये जनताच देव असल्याने आम्ही जनतेसाठीच महाजानादेश यात्रा काढली आहे. लोकसभेप्रमाणे राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येणार आहे यात दुमत नाही, मात्र पाच वर्षात आपण जनतेसाठी काय केले आहे ते जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जळगाव शहराला दिलेला निधीपैकी ५० टक्के निधी खर्च केल्यास पुन्हा जळगाव शहराला १०० कोटी रुपये देईल असे मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिले.