अहमदनगर-लोकपालच्या अंमलबजावणीसाठी गेल्या चार वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठपुरावा करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या लढ्याला अखेर यश मिळण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून अण्णा हजारेंना निरोप आला असून लवकरच केंद्रातून सचिव स्तराचे अधिकारी चर्चेसाठी राळेगणसिद्धी येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
२ ऑक्टोबरपासून पुन्हा उपोषण
शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती अशा विविध मागण्यांसाठी अण्णा हजारे यांनी २३ मार्चपासून दिल्लीत आंदोलन सुरू केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर अण्णा हजारेंनी सहा दिवसांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र, यानंतरही मागण्यांबाबत कार्यवाही होत नसल्याने अण्णा हजारे नाराज होते. त्यांनी नुकतेच केंद्र सरकारला पत्र पाठवून मागण्यांची दखल न घेतल्यास २ ऑक्टोबरपासून पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला होता.
अखेर अण्णा हजारे यांच्या मागण्यांबाबत केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून निरोप आला असून लवकरच केंद्र सरकारचा प्रतिनिधी चर्चेसाठी राळेगणसिद्धीत येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सचिव स्तराचा अधिकारी पाठवला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान कार्यालयाने दिल्याचे सूत्रांनी सांगितले.