पुणे :- पुणे रेल्वे स्थानकाजवळील सिग्नल यंत्रणेमध्ये आज सकाळी तांत्रिक बिघाड झाल्याने लोणावळ्याकडून पुण्याकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे काही रेल्वे गाड्यांना सिग्नल मिळाला नसल्यामुळे बराच वेळ थांबून होत्या. दोन लोकल खडकी आणि शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर दीड ते दोन तास थांबून होते. दरम्यान कोयना एक्सप्रेसला अर्ध्या तासाच्या विलंबानंतर ट्रॅक उपलब्ध करून देण्यात आल्याने ती पुण्याकडे रवाना झाली. त्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
सिग्नल न मिळाल्यामुळे रेल्वेगाड्या एकाच जागेवर थांबून
सिग्नल न मिळाल्यामुळे रेल्वेगाड्या एकाच जागेवर बराच वेळ थांबून होत्या. खडकी रेल्वे स्थानकावर लोणावळा-पुणे लोकल बाराच्या सुमारास आली. तिला सिग्नल न मिळाल्यामुळे सुमारे एक तास थांबावे लागले. एक तासाच्या प्रतीक्षेनंतर लोकलला सिग्नल मिळाला असता एक वाजता पुन्हा एक लोकल गाडी खडकी स्थानकावर आली. खडकी स्थानकावरून निघालेली लोकल पुन्हा शिवाजीनगर स्थानकावर सिग्नल न मिळाल्याने अडकली. दरम्यान मुंबई-कोल्हापूर (कोयना एक्सप्रेस) गाडीला देखील अर्धा तास थांबविण्यात आले. दीड तासाच्या कालावधीत पुणे रेल्वे स्थानकासह, शिवाजीनगर, खडकी रेल्वे स्थानकावर देखील रेल्वेगाड्या सिग्नलच्या प्रतीक्षेत होत्या. लोणावळा-पुणे लोकल प्रवाशांचे यामुळे चांगलेच हाल झाले असून सव्वाएकच्या सुमारास रेल्वेची सिग्नल यंत्रणा व्यवस्थित झाली असल्याचे सांगण्यात आले.