लंडन-भारताविरोधातील कसोटीत पाच बळी घेत इंग्लंडचा जेम्स अँडरसन लॉर्ड्सवर ९९ बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. आणखी एक बळी घेतल्यास तो एकाच मैदानावर शंभर बळी घेणारा जगातील दुसरा गोलंदाज बनेल. या आधी मुरलीधरन याने तीन मैदानांवर प्रत्येकी शंभर पेक्षा जास्त बळी मिळवले आहेत.
पहिल्या दिवसापासून पावसाने व्यत्यय आणलेल्या कसोटी सामन्यात भारताचा डाव १०७ धावांवरच आटोपला. अँडरसनने इशांत शर्माला पायचीत करत भारताचा डाव संपवला. त्यासोबतच भारताचे सर्वात जास्त बळी घेण्याचा विक्रम त्याने नोंदवला. भारताविरोधातील हा त्याचा ९५ वा बळी ठरला. भारताचे सर्वाधिक फलंदाज बाद करणा-या वेगवान गोलंदाजांच्या यादीत अँडरसनने पाकिस्तानच्या इम्रान खान (९४ बळी) यांना मागे टाकले. लॉर्ड्सवर 5 पेक्षा जास्त बळी घेण्याची कामगिरी त्याने सहाव्यांदा केली आहे. लॉर्ड्सवर सर्वात जास्त बळी घेणारा तो गोलंदाज आहे. त्यापाठोपाठ स्टुअर्ट ब्रॉड याने लॉर्ड्सवरील २१ कसोटीत ७९ बळी घेतले. अँडरसन याने २३ कसोटी सामन्यात ही कामगिरी केली आहे.