पत्नीचे आजारपण, शेतीमुळे वाढलेल्या कर्जाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

0

चिठ्ठी लिहून केले होते विषप्राशन ; उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मालवली प्राणज्योत

जळगाव- कॅन्सर असलेल्या पत्नीच्या उपचारासाठी तसेच शेतीसाठी कर्ज काढले, मात्र नापिकीमुळे परतफेड न झाल्याने कर्जाचा डोंगर वाढला, यामुळे यापुढे आर्थिक खर्च करुन शकत नाही, अशी चिठ्ठी लिहून शेतकरी सुनील धोंड चौधरी वय 48 रा. कासोदा ता.एरंडोल यांनी बांभोरी शिवारात शेतात 28 रोजी विषप्राशन केले होते. 30 रोजी 10.30 वाजता जिल्हा रुग्णालया उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.

विषप्राशनापूर्वी भाचा, मुलाला केला फोन
28 रोजी दुपारी तीन वाजता सुनील चौधरी यांनी शेतात विषप्राशन केले. यानंतर त्यांनी त्यांचा पारोळा येथील भाचा रविंद्र निंबा पाटील व मोठा मुलगा विजय या दोघांना विषप्राशन केल्याबाबत फोन केला. विजय काकासह तातडीने शेतात गेला व वडीलांना जिल्हा रुग्णालयात हलविले. उपचार सुरु असताना 30 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

कर्जाच्या डोंगरमुळे आर्थिक खर्च अशक्य
पत्नी कल्पना हिला दीड वर्षापासून कॅन्सर आहे तिच्या उपचारासाठी कर्ज काढले. तसेच शेतीसाठी खाजगी तसेच विकासोचे कर्ज घेतले. नापिकीमुळे कर्जफेड झाली नाही. कर्जाचा डोंगर वाढला. 2 लाख रुपये कर्ज असल्याने व त्यातच पत्नीचे आजारपण यामुळे यापुढे आर्थिक खर्च अशक्य असून यामुळे नैराश्यात असल्याने विषप्राशन करुन आत्महत्येचे पाऊल उचलले असे चिठ्ठीत नमूद आहे, अशी माहिती विजय चौधरी यांनी बोलतांना दिली. सुनील चौधरी यांच्याकडे वडीलोपार्जित 7 एकर शेती आहे. त्यांच्या पश्‍चात्त पत्नी दोन मुले व दोन मुली असा त्यांचा परिवार आहे. दोन्ही मुली आश्‍विनी व शितल विवाहित आहेत. मोठा मुलगा विजय फार्मसीच्या दुसर्‍या वर्षाला तर लहान उमेश हा दहावीला शिक्षण घेत आहेत.