लेफ्टनंट कर्नल धोनीला काश्मीरमध्ये पोस्टिंग !

0

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार माही अर्थात महेंद्रसिंह धोनीला लष्कराचे लेफ्टनंट कर्नल (मानद) पद देण्यात आले आहे. त्यासाठी त्याने प्रशिक्षण देखील सुरु केले आहे. दरम्यान धोनीची पोस्टिंग काश्मीरमध्ये करण्यात आली आहे. पेट्रोलिंग, गार्ड, पोस्ट ड्युटी यांसारखी जबाबदारी तो सांभाळणार आहे, अशी माहिती भारतीय लष्कराकडून आज गुरूवारी २५ रोजी देण्यात आली आहे.

31 जुलै ते 15 ऑगस्ट 2019 पर्यंतच्या काळात लेफ्टनंट कर्नल (मानद) धोनी 106 टी.ए.बटालियनमध्ये सामील होणार आहे. व्हिक्टर फोर्सचा भाग असलेल्या या युनिटची पोस्टिंग काश्मीर खोऱ्यात असणार आहे. अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनुसार आणि लष्कर मुख्यालयाकडून मिळालेल्या मान्यतेनंतर धोनी पेट्रोलिंग(गस्त) गार्ड आणि पोस्ट ड्युटी यांसारख्या जबाबदाऱ्या सांभाळेल आणि सैनिकांसोबतच राहील.

पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असलेल्या धोनीला लष्कराने लेफ्टनंट कर्नलपद दिले आहे. २०११ सालीच लष्कराने त्याला हा सन्मान दिला. अभिनव बिंद्रा आणि दीपक रावसोबत धोनीला हे पद देण्यात आले होते. २०१५ साली धोनीने आग्रा येथे पॅराशूट जंपिंगचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. पॅराशूट रेजिमेंट लष्कराची स्पेशल फोर्स आहे. अलीकडेच वर्ल्डकप संपल्यानंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगली होती. पण मागच्याच आठवडयात धोनीने आपण वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी उपलब्ध नसल्याचे कळवले. त्यामुळे तूर्तास धोनीच्या निवृत्तीची चर्चा थांबली आहे. धोनीच्या निवृत्तीवरुन क्रिकेटप्रेमींमध्ये मतभेद आहेत. धोनी आता ३८ वर्षांचा असून पुढच्या वर्ल्डकपमध्ये त्याला संधी मिळण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे. त्यामुळे धोनीने सन्मानाने निवृत्ती स्वीकारावी असे अनेकांचे मत आहे.