माधव भंडारी यांना अखेर मंत्री पदाच्या दर्जाचा ‘भंडारा’!

0

भुसंपादन प्राधिकरणाचे पुनर्गठन करून माधव भंडारी यांची मंत्री दर्जा देवून नियुक्ती!

मुंबई :- मुंबई : अखेर भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांना पक्षाने मानाचे स्थान दिले आहे. मंत्री पदाचा दर्जा असलेल्या राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मागे विधानपरिषदेवर पाठविताना त्यांचे ‘लाड’ न झाल्याने ते काहीसे नाराज झाले होते. राज्य शासनाने आज याबाबतचा आदेश जारी केला. भूमीसंपादन करताना संबंधितांचे योग्य ते पुनर्वसन व्हावे याची खातरजमा करण्याचे काम ही समिती करते. या समितीचे उपाध्यक्ष म्हणून भांडारी यांना बैठकीसाठी ५०० रूपये भत्ता, निवासी दूरध्वनीसाठी दरमहा तीन हजार रूपयांची प्रतिपूर्ती, चालकासह वाहनाची सुविधा (खर्चमर्यादा वर्षाला ७२ हजार रूपये) किंवा खाजगी वाहन चालकास दरमहा १० हजार रूपये, बैठकीनिमित्त राहण्याची सोय, प्रवासभत्ता तसेच दैनिक भत्ता देय राहील.

नाणार तेल शुध्दीकरण प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने आज महत्वाचे पाऊल टाकणारे दोन शासन निर्णय जारी केले आहेत. त्यानुसार महसूल आणि वन विभागा अंतर्गत येणा-या राज्य पुनर्वसन प्राधिकरण आणि राज्य पुनर्वसन आणि पुनर्स्थापना संनियंत्रण समिती यांचे एकत्रीकरण करण्यात आले असून त्यात मंत्री दर्जाचे उपाध्यक्ष पद निर्माण करण्यात आले आहे. या पदावर भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांची नियुक्ती करण्याचा स्वतंत्र शासन निर्णय निर्गमीत करण्यात आला आहे. या नव्या एकत्रीकरण केलेल्या समितीचे अध्यक्ष मदत आणि पुनर्वसन मंत्री असतील तर त्यात सदस्य म्हणून महसूल, वने, ऊर्जा, उद्योग आणि वित्त मंत्री तसेच या विभागाचे सचीव असतील.