मध्यप्रदेशात बोगस मतदान याद्या तयार होत आहे- ज्योतिरादित्य शिंदे

0

भोपाळ-मध्य प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये बोगस मतदान करता यावे यासाठी बोगस मतदार याद्या तयार करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारवर केला आहे. ‘गेल्या दहा वर्षांत लोकसंख्येत २४ टक्क्यांनी वाढ झाली तर राज्यात ४० टक्के मतदारांची संख्या कशी काय वाढली? असा सवालही त्यांनी निवडणूक आयोगाला केला आहे.

एकाच उमेदवाराचे नाव २६ जागी

भाजपाकडून जाणिवपूर्वक हा प्रकार करण्यात आला आहे. त्यांच्या विशेष टीमने विधानसभेच्या १०० मतदार याद्यांचे निरिक्षण केले आहे. यामध्ये एकाच उमेदवाराचे नाव २६ जागी आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणी तत्काळ कारवाईची मागणीही त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

निवडणूक आयोगाला पुरावे दिले

मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी निवडणूक आयोगाला या प्रकारासंदर्भात पुरेसे पुरावे दिले असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर राज्यात सुमारे ६० लाख बोगस मतदारांच्या नावांवर आक्षेप घेत ही मतदार यादी हटवण्याची मागणी केली आहे. हा प्रशासनाचा बेजबाबदारपणा नव्हे तर प्रशासनाचा दुरुपयोग असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या वर्षाच्या शेवटी मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी राज्याच्या निवडणूक आयोगाने मतदार यादीचे प्रकाशन केले आहे. यामध्ये अनेक घोटाळे समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रवक्ते मानक आग्रवाल यांनी म्हटले होते की, एकाच फोटोवर ४० लोक मतदान करीत आहेत. यामध्ये पुरुष आणि महिला दोघांचाही समावेश आहे. या खेळामध्ये सर्वच जिल्हाधिकाऱ्यांचा वापर करण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.