भोपाळ-मध्यप्रदेशात यावेळी विधानसभा निवडणुकीत तरुण मतदार विजयाचे शिल्पकार ठरणार असल्याचे बोलले जात आहे. मध्य प्रदेशमध्ये १५ लाख असे मतदार आहेत जे पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहे. तसेच २९ पर्यंत वय असलेले तरुण मतदारांची संख्या १.५० कोटीच्या जवळपास आहे.त्याचाच फायदा घेत राजकीय पक्षांनी तरुणांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी कोणतीही कमतरता सोडलेली नाही.
असे असले तरी मध्य प्रदेशमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपने भाजप युवा मोर्च्याच्या एकाही सदस्याला निवडणुकीची उमेदवारी दिलेली नाही. तर दुसरीकडे कॉंग्रेसने मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत तरुणांवर अधिक विश्वास ठेवत पक्षाच्या एनएसयुआयच्या प्रदेश अध्यक्ष विपिन वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल चौधरी यांना देखील पक्षाने उमेदवारी दिली आहे. कुणाल चौधरी हे कालापीपल येथून ते निवडणूक लढविणार आहे. कॉंग्रेसने युवक कॉंग्रेस व एनएसयुआयच्या डझनभर कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी संधी दिलेली आहे.
भाजप कार्यकर्ते नाराज
भाजपने युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांना संधी दिलेली नाही त्यामुळे नाराजीचे सूर आहे. भाजप युवा मोर्च्याचे माजी अध्यक्ष धीरज पटैरिया उमेदवारी मिळाली नसल्याने बंडखोरी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.