कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन

0

हृदयविकाराचा तीव्र झटका ; महाराष्ट्राच्या राजकारणातील बडा चेहरा हरपला

मुंबई : कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचं गुरुवारी पहाटे 4.32 वाजता हृदयविकाराने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांना गुरुवारी पहाटे मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पांडुरंग फुंडकर यांच्या अकाली निधनाने भाजपसह सर्वच पक्षांना मोठा धक्का बसला. फुंडकर हे काही आजारी नव्हते मात्र हृदयविकाराने त्यांना अवचित गाठल्याने, महाराष्ट्राच्या राजकारणातील बडा चेहरा हरपला आहे. महाराष्ट्रात भाजप वाढवण्यासाठी पांडुरंग फुंडकर यांचं मोठं योगदान आहे. गोपीनाथ मुंडेंसोबत त्यांनी महाराष्ट्रात भाजपचा प्रचार आणि प्रसार केला. ग्रामीण आणि शेती प्रश्नाची जाण असल्याचा नेता म्हणून फुंडकर परिचीत होते. फुंडकर यांनी भाजपचं प्रदेशाध्यक्षपदही भूषवलं होतं.