महाराष्ट्र बंद : 10 ऑगस्टपर्यंत आंदोलकांवरील गुन्हे मागे न घेतल्यास 15 ऑगस्टपासून चूल बंद

0

औरंगाबाद- मराठा समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीने केवळ आश्‍वासने नकोत, ठोस अंमलबजावणी हवी. सरकारवर आमचा विश्‍वास नाही. म्हणूनच समाजाच्या विविध 20 मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कोर्टाचा सन्मान, आदर राखून 9 ऑगस्ट रोजी अहिंसात्मक, असहकार व शांततेच्या मार्गाने ’महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. बुधवारी औरंगाबादेत समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 10 ऑगस्टपर्यंत आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा 15 ऑगस्टपासून एक वेळ चूल बंद, अन्नत्याग आंदोलनास सुरुवात होईल, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील, प्रा. चंद्रकांत भराड, राजेंद्र दाते पाटील, किशोर चव्हाण, रवींद्र काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

21 जुलैपासून उपोषण, ठिय्या, रास्ता रोको, जलसमाधी, आक्रोश, बोंबा मारो अशा अनेक प्रकारे आंदोलन सुरू आहे. काही ठिकाणी हिंसक वळण लागले. काही सुशिक्षित मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या. हे हिंसक आंदोलन व आत्महत्या थांबाव्यात म्हणून ठोस निर्णय घेण्याच्या दृष्टीने बुधवारी बैठक घेण्यात आली. या वेळी राजेंद्र जंजाळ, सुरेश वाकडे, विजय काकडे, मनोज गायके, डॉ. कल्याणराव काळे, जगन्नाथ काळे, मिलिंद पाटील, उदय पाटील, अभिजित देशमुख व्यंकटेश शिंदे, शांताराम कुंजीर आदींसह 32 जिल्ह्यांतील समन्वयक हजर होते. दरम्यान, बंदच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी मुंबईत मुख्य सचिवांनी अधिकार्‍यांची बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

गुरुवारी नाशकात बंद किंवा चक्का जाम नाही…
नाशिकमध्ये बंद किंवा चक्काजाम आंदोलन होणार नाही. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत डोंगरे वसतिगृह मैदानावर ठिय्या आंदोलन करून जिल्हाधिकार्‍यांना, तर ग्रामीण भागात तहसीलदारांना निवेदन दिले जाणार आहे.

आंदोलनाचे 8 दिवसांचे धोरण केले जाहीर
9 ऑगस्ट-
सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत महाराष्ट्र बंद.
अ‍ॅम्ब्युलन्स, शाळेच्या बस, मेडिकल, एसटी, धार्मिक यात्रा वाहने वगळणार, हिंसाचाराला थारा नाही, आंदोलक, लहान मुले ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत रास्ता रोको, ठिय्या, उपोषण, आक्रोश आंदोलन करतील.

10 ऑगस्ट-
सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरकारने आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावेत, आत्महत्या व हिंसाचार रोखण्यासाठी तीन दिवस संवाद यात्रेद्वारे 10 ते 12 ऑगस्टपर्यंत प्रबोधन, ज्ञानदानाचे कार्य, 21 मराठा तरुणांनी आत्मबलिदान केले. त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये आणि एकाला नोकरी द्यावी आदी मागणी करण्यात येणार आहे.

आमचा लढा सरकारशी, पोलिसांशी नाही
सरकारवर दबाव कायम ठेवण्यासाठी पुढील दिशा निश्‍चित करण्यावर बैठकीत एकमत झाले. हिंसाचार थांबवण्यासोबतच आत्महत्या रोखण्यासाठी पुढाकार घेण्याचेही ठरले. गुरुवारी महाराष्ट्रात कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय झाला. ’आमचा लढा सरकारशी आहे, पोलिसांशी नाही. हे प्रथम पोलिस प्रशासनाने समजून सहकार्य करावे, असेही आवाहन आंदोलकांमार्फत करण्यात येत आहे.