मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचं आयोजन मुंबईमध्ये काल करण्यात आलं होतं. ज्येष्ठ निरूपणकारक डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला आलेल्या श्रीसेवकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे.
उदय सामंत म्हणाले की, महाराष्ट्रातील उष्माघाताने मृत झालेल्यांची संख्या १३ वर पोहोचली आहे. १८ जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. घटनास्थळी बाधितांसाठी ७५ रुग्णवाहिका होत्या. ६०० मदतनीस होते. १५० नर्स होत्या. तिथे अधिकारी आणि डॉक्टर नेमले होते. यायला आणि जायला जवळपास १०५० बसेस होत्या.
प्रशासनाकडून श्रीसेवकांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण त्या दोन दिवसात वातावरण बदललं, तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअसवर पोहोचलं. आप्पासाहेबांना बघता यावं यासाठी अनेक श्रीसेवक १४ तारखेपासूनच यायला सुरूवात झाली होती. सगळ्यांनी एकत्र येऊन कार्यक्रामाचं नियोजन करण्यात आलं होतं. वैद्यकीय सुविधांमध्ये ब्लड बँक पासून प्राथमिक उपचारांसाठी लागणारी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
कार्यक्रम दुपारी का ठेवला?
हा कार्यक्रम संध्याकाळी घ्यायचा होता. मात्र सर्वांना कार्यक्रम संपवून प्रत्येकाला घरी परतात आले पाहिजे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा कार्यक्रम दुपारी ठेवला, असंही उदय सामंत म्हणाले.