मुंबई : राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्षाचे काही नेते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होत, अखेर आज मुंबईतल्या गरवारे क्लब येथे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईक, काँग्रेसचे कालिदास कोळंबकर, राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, नवी मुंबईतील काही नगरसेवकांसह राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार, विनोद तावडे आदी नेत्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला.
शिवेंद्रसिंहराजे यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्यानंतर ते पक्ष सोडणार नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले होते. त्यासाठी शिवेंद्रसिंहराजे व उदयनराजे यांचा वाद मिटवण्याचाही प्रयत्न झाला. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह बाजार समिती, खरेदीविक्री संघ आणि जिल्हा बँकेचे संचालकही भाजपा डेरेदाखल झाले आहेत. शरद पवार यांचे खंदे समर्थक मानले जाणारे मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव यांनी पाच वर्षांपासून अकोले तालुक्याचा विकास रखडल्यानेच आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते.
तर कोळंबकर यांनी आधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे पक्षाचा राजीनामा दिला होता. कोळंबकर हे पूर्वीच्या नायगाव आणि आताच्या वडाळा मतदारसंघातून सहा वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाविषयी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. भाजप नेत्यांनी म्हात्रे यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी नाराजी कायम ठेवून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर भूमिका स्पष्ट केली.