२०२५ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर होईल-मुख्यमंत्री

0

वॉशिंग्टन – महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सन २०२५ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर करण्याची महत्वाकांक्षा असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिकेत केले. महाराष्ट्र सरकार पायाभूत सुविधा, शेती आणि सेवांसह विविध क्षेत्रात परकीय गुंतवणुकीचा लाभ घेत हे लक्ष्य साध्य करण्याच्या प्रयत्नात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस हे जॉर्जटाउन विद्यापीठ इंडिया इनिशिएटिव्ह आणि स्ट्रॅटेजिक अॅण्ड इंटरनॅशनल स्टडिज (सीएसआयएस) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते.

सध्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ४०० अब्ज डॉलर्स आहे. सध्याचा विकास दर पाहता २०३० पर्यंत महाराष्ट्र १ ट्रिलियन-डॉलरची अर्थव्यवस्था होईल. पण आम्हाला हे ध्येय पाच वर्षांपूर्वीच साध्य करायचे आहे. आम्हाला यात यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य सरकारने मागील ४ वर्षांत केलेल्या विकासकामांचे सादरीकरण ही केले. यामध्ये दुष्काळमुक्त राज्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नांसह, पायाभूत क्षेत्रातील मोठ्या गुंतवणुकींचाही समावेश होता.