१४ मे रोजी राज्यभर आंदोलनाची हाक
सुकाणू समितीची पत्रकार परिषदेत माहिती
मुंबई :- शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी आणि शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात राज्य शेतकरी सुकाणू समितीने छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून १४ मे रोजी राज्यात जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे. या जेलभरोत सहभागी होण्यासाठी मागील काही महिन्यांपासून तब्बल २ लाखांहून अधिक शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आपले अर्ज भरून नोंदणी केली असल्याची माहिती सुकाणू समितीचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिली.
राज्यभरातील तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयासोबत स्थानिक पोलीस ठाण्यात जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. यात राज्यातील बँक आणि इतर कामगार संघटनाही सहभागी होणार असल्याची माहिती पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
समितीच्या वतीने बेळगावसह राज्यातील ३६ जिल्ह्यांतील शेतकरी जागर यात्रा यशस्वी केल्यानंतर हे जेलभरो आंदोलन केले जाणार आहे. यात शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला जाणार आहे. तसेच, यात सरसकट कर्जमुक्ती, वीजबिल मुक्ती, शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा इतका हमीभाव, पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील विमानतळ, समृद्धी महामार्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरी नाणार प्रकल्प रद्द करणे, आदी मागण्या यात केल्या जाणार आहेत.