मुंबई – राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाने ‘महाराष्ट्र अहेड’ या इंग्रजी विशेषांकात विद्यार्थी दशेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणून दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा फोटो छापला आहे. सरकारच्या या भोंगळ कारभारावर सर्वत्र टीका होत आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण याबाबत म्हणाले, की या सरकारला बाबासाहेबांबद्दल श्रद्धा नाही.
सरकारी खर्चात मुख्यमंत्री माहिती संचालनालयाच्या माध्यमाने स्वतःची प्रतिमा उजळ करत आहेत. त्यांना सरकारच्या प्रतिमेचे काही देणेघेणे नाही. संघाचा अजेंडा माहिती संचालनालय राबवत आहे. या विभागाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी झालेल्या प्रकाराची जबाबदारी घ्यावी, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण केली आहे.
सरकारची ही अक्षम्य चूक आहे. या गंभीर प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित केली पाहिजे, अशी मागणीही चव्हाण यांनी केली. सरकारचे सरकारी विभागांवर नियंत्रण राहिले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान व्यक्तित्वबाबत जर आशा चुका होत असतील, तर इतरांविषयी कशा चुका होत असतील याचा अंदाज वर्तवता येत नाही. अशा चुका होऊ नये याबद्दल सरकारने काळजी घ्यावी, असे बाबासाहेबांचे नातू आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्य माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाचे संचालक आणि संबंधित विशेषांकाच्या संपादकीय मंडळाचे प्रमुख अजय आंबेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चूक कबुल केली आहे. तसेच, अशा चुका प्रसिद्धी माध्यमात होत असतात. मात्र, ही संपादकीय मंडळाची चूक नाही, हा विशेषांक खाजगी कंपनीकडे छपाईसाठी पाठवला होता. त्या कंपनीला नोटीस दिली असून छापण्यात आलेल्या अंकांचे वितरण थांबवले असल्याचे आंबेकर यांनी सांगितले.