मुंबई – आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना नेते दीपक सावंत यांचा मंत्रीपदाचा कालावधी आज संपणार आहे. सावंत यांच्या जागी संधी मिळावी, यासाठी सध्या शिवसेना नेत्यांकडून फिल्डिंग लावली जात आहे.
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची उमेदवारी न मिळाल्याने गेल्या वर्षी ४ जुनला राजीनामा दिला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राजीनामा थांबवण्याचा सल्ला दिला. यानंतर सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्याआधी त्यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सुपूर्द केला होता.
मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेने विलास पोतनीस यांना उमेदवारी देत सावंत यांचा पत्ता कट करण्यात आला. विलास पोतनीस हे शिवसेनेचे बोरिवलीचे विभागप्रमुख आहेत. त्यांनी पदवीधर मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कार्यपद्धतीबाबत शिवसैनिकांमध्ये आणि विशेष करून युवासेनेमध्ये नाराजी होती.