नाराजी होण्यापेक्षा विस्तार टाळण्यावर भर, सेनेची मनधरणी सुरूच
भाजपातच मंत्रिपदासाठी सुरु असलेली मोठी स्पर्धा विस्तारासाठी मुख्य अडसर
मुंबई (निलेश झालटे):- गेल्या वर्षीपासून गाजत असलेला मंत्रिमंडळ विस्तार आता होण्याची चिन्हे कमीच दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशातून आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र भाजपच्या इच्छुकांची संख्या वाढली असून शिवसेना देखील नाराज असल्याने त्यांनीही मंत्रीपद देताना कस लागण्याची शक्यता असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणार असल्याची शक्यता आहे. त्यातच भविष्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार पण कधी यावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही चुप्पी साधल्याने विस्तारावर सध्यातरी मोठा ब्रेक लागला असल्याचे चित्र आहे. विस्तार न करता सत्तेतील सहकारी शिवसेनेची मनधरणी करण्याचे प्रयत्न भाजपने सुरु केले असून आदेश बांदेकर यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा देऊन हे स्पष्ट केले आहे.
भाजपमधील एका ज्येष्ठ नेत्याने जनशक्तिशी बोलताना सांगितले कि, आता विस्तार करणे मुख्यमंत्र्यांना परवडणारे नाही. आता आमदारांना नाराज करणे त्यांच्यासाठी धोकादायक ठरणार आहे. कुणाला घ्यायचे, कुणाला नाही यासाठी भाजपमध्ये देखील अंतर्गत वेगवेगळे मतप्रवाह बनत चालल्याने डोकेदुखी वाढली आहे. सोबतच भाजपचे निर्णय हे जास्तकरून राज्यात नाही तर केंद्रात होतात. म्हणून सध्या तरी लोकसभेवर लक्ष केंद्रित करण्याचे चालले असल्याची माहिती त्या नेत्याने दिली. विस्तारासाठी भाजपमध्येच मोठी स्पर्धा लागली आहे. जर विस्तार झालाच तर विस्तारात मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, आमदार योगेश सागर, डॉ.संजय कुटे तसेच खानदेशातील कोरम भरून काढण्यासाठी हरिभाऊ जावळे यांच्यासह आणखी काही नावे चर्चेत आहेत. तर सत्तेतील सहकारी म्हणून नाराज असलेल्या शिवसेनेलाही यामध्ये काही मंत्रिपदे द्यावी लागणार आहेत. यामध्ये शंभूराजे देसाई, अनिल परब, बालाजी किणीकर, नीलम गोर्हे यांच्या नावांची चर्चा आहे. शिवसेनेपेक्षा भाजपात असलेली मंत्रीपदाची स्पर्धा डोकेदुखी करणारी आहे.
मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर असताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सिंचन व वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या नेमणुका शिवसेनेला विश्वासात न घेता केल्याने शिवसेना नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सेनेची नाराजी दुसऱ्या मार्गाने भरून काढण्याचे प्रयत्न भाजपा करत आहे. सरकारचा कालावधी अवघा एक वर्षाचा उरला असल्याने भाजप मधील वरिष्ठ नेते विस्तार करण्याच्या पक्षात नाहीत. मात्र मंत्रिमंडळात येण्यासाठी अनेकांनी लॉबींग सुरु केले आहे. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने मुख्यमंत्र्यांना ही तारेवरची कसरत करावी लागणार आहे. येत्या चार जुलैपासून पावसाळी अधिवेशन नागपूर इथे सुरु होत आहे. तत्पूर्वी विस्ताराच्या निमित्ताने काही मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याचीही जोरदार चर्चा होती. पण निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतर्गत नाराजी ओढावून घेण्यापेक्षा शिवसेना आणि भाजप युतीतल्या वादात मंत्रिमंडळ विस्तार लांबवणे उचित असल्याचा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे.