नवी दिल्ली-भारतात गेल्या ६ वर्षांमध्ये दत्तक घेतलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या मुलींची आहे, अशी माहिती सरकारी आकडेवारीवरुन समोर आली आहे. दत्तक घेतलेल्यांमध्ये ६० टक्के प्रमाण मुलींचे आहे. विशेष म्हणजे, मुलींना दत्तक घेण्याच्या बाबतीत महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. दुस-या क्रमांकावर कर्नाटक तर तिस-या क्रमांकावर पश्चिम बंगाल आहे. २०१२ पासून प्रत्येक राज्यामध्ये मुल दत्तक घेण्याचं प्रमाण किती आहे, याबाबत जाणून घेण्यासाठी दाखल केलेल्या माहितीच्या अधिकाराला चाइल्ड अॅडॉप्शन रिसर्च ऑथोरिटीने (CARA) उत्तर दिलं आहे.
यानुसार, भारतात वर्ष २०१७-१८ मध्ये एकूण ३ हजार २७६ जणांना दत्तक घेण्यात आलं, त्यापैकी १ हजार ८५८ मुली होत्या. महाराष्ट्रात २०१७ मध्ये ६४२ जणांना दत्तक घेण्यात आलं, त्यापैकी मुलींची संख्या ३५३ इतकी आहे. CARAचे सीईओ लेफ्टनंट कर्नल दिपक कुमार यांच्यानुसार, ‘महाराष्ट्रात मुल दत्तक देणा-या संस्था ६० आहेत तर सरासरीचा विचार करता इतर राज्यात या संस्था २० च्या जवळपास आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात दत्तक घेण्याचं प्रमाण जास्त आहे’. २०१६-१७ च्या आकडेवारीनुसार, भारतात एकूण ३ हजार २१० जणांना दत्तक घेण्यात आलं. त्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ७११, त्यानंतर कर्नाटक (२५२) आणि पश्चिम बंगालचा (२०३) क्रमांक आहे.