मुंबई : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला लोकसभा ३८ तर विधानसभेला १८० जागा मिळतील असा विश्वास काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. ते धुळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान होत आहे. अशातच दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अयोध्या दौरा करत आहेत. जेव्हा कुटुंबातील सर्व परिस्थिती चांगली असते तेव्हा देवदर्शनाला जावे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ईव्हीएम मशीनवर माझा विश्वास असल्याचे वक्तव्य केलं होतं. याबाबतही बाळासाहेब थोरात यांना विचारण्यात आलं, त्यावेळी ते म्हणाले की, जेव्हा निवडणुकीचा निकाल समोर येतो तेव्हा ईव्हीएम मशीनबाबत संशय निर्माण होतो. कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे थोरात म्हणाले.