बंडखोर उमेदवारांमुळे महायुती घामाघुम

0

जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत बंडखोरांनी घेतले साडेतीन लाखांहून अधिक मतदान

जळगाव – जिल्ह्यात विधानसभेची यावेळेची निवडणूक चर्चेत राहीली ती बंडखोर उमेदवारांमुळे. जिल्ह्यातील सात मतदारसंघांमध्ये भाजपा आणि शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी बंडखोरी करीत तब्बल साडे तीन लाखाहुन अधिक मतदान घेतले. यात आठ पैकी सात बंडखोर उमेदवारांनी पराभवाचे तोंड बघितले तर एका बंडखोर उमेदवारांनी निवडणुकीत विजय प्राप्त केला.

राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोर उमेदवारांचा भाजपाला फटका बसल्याची कबुली दिली होती. जळगाव जिल्ह्यात देखिल मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली. जिल्ह्यात 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक यापेक्षा सत्ताधारी आणि बंडखोर यांचीच चर्चा अधिक होती. जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंड करून उमेदवारी केली. भुसावळ, पाचोरा, चोपडा, जळगाव ग्रामीण, चाळीसगाव, एरंडोल, रावेर या मतदारसंघात भाजपाने तर आणि मुक्ताईनगर या आठ पैकी सात मतदारसंघात भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी बंडखोरी केली तर मुक्ताईनगर येथे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने बंडाचे निशाण फडकविले.

बंडखोरीमुळे भाजपाचे दोन उमेदवार पराभूत

जिल्ह्यात शिवसेनेला रोखण्यासाठी नियोजनबध्दरित्या भाजपाने बंडखोर उमेदवार उभे केले. मात्र हे बुमरँग त्यांच्यावरच उमटले. रावेर मतदारसंघात भाजपाचे बंडखोर उमेदवार अनिल चौधरी यांना 44 हजार 733 मते मिळाली. त्यामुळे विद्यमान आ. हरीभाऊ जावळे हे पराभूत झाले. तर मुक्ताईनगरात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या उमेदवार अ‍ॅड. रोहिणी खडसेंविरोधात बंडखोरी केली. या बंडखोरीला राष्ट्रवादी काँग्रेसने पुरस्कृतचे बळ दिले. खडसेंविरूध्द सर्वपक्षिय असे चित्र या मतदारसंघात बघायला मिळाले. त्यामुळे अ‍ॅड. रोहिणी खडसे यांचा अवघ्या 1987 मतांनी पराभव झाला.

इतर तीन ठिकाणी बंडखोरांनी घाम फोडला

जिल्ह्यात भुसावळ, पाचोरा, चोपडा, जळगाव ग्रामीण, चाळीसगाव, एरंडोल यापैकी पाचोरा, जळगाव ग्रामीण, पारोळा या तीन ठिकाणी बंडखोर उमेदवारांनी महायुतीच्या उमेदवारांना चांगलाच घाम फोडला होता. पाचोरा येथे भाजपाचे बंडखोर अमोल शिंदे आणि महायुतीचे आ. किशोर पाटील यांच्यात काट्याची लढत झाली. या लढतीत आ. किशोर पाटील यांचा निसटता विजय झाला. तर जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील व एरंडोलमध्ये चिमणराव पाटील यांनाही विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. भुसावळ, चोपडा, चाळीसगाव या ठिकाणी मात्र बंडखोर उमेदवार साफ निष्प्रभ ठरले.

बंडखोर उमेदवारांनी मिळालेली मते

भुसावळ – डॉ. मधु मानवतकर(भाजपा बंडखोर) 28400
पाचोरा – अमोल शिंदे (भाजपा बंडखोर) 73146
चोपडा – प्रभाकर सोनवणे (भाजपा बंडखोर) 31932
जळगाव ग्रामीण – चंद्रशेखर अत्तरदे (भाजपा बंडखोर) 58724
चाळीसगाव – डॉ. विनोद कोतकर (भाजपा बंडखोर) 4533
एरंडोल – गोविंद शिरोळे (भाजपा बंडखोर) 24503
रावेर – अनिल चौधरी (भाजपा बंडखोर) 44733
मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील (शिवसेना बंडखोर) 90698
एकुण मते 356669