नवी दिल्ली-लॉर्ड्सच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशा केली आहे. इंग्लंडच्या संघाने दिलेले ३२३ धावांचे आव्हान भारतीय संघाने पूर्ण केले नाही. त्यामुळे पराभवाचा सामना करावा लागला. मात्र भारताचा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंह धोनीने या सामन्यात विक्रमाची नोंद केली आहे. आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारा धोनी चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वात अशी कामगिरी करणारा धोनी बारावा फलंदाज ठरला आहे. धोनीव्यतिरीक्त भारताच्या सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी वन-डे क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. याचसोबत जागतिक क्रिकेटमध्ये १० हजार धावांच्या जादूई आकड्याला गवसणी घालणारा तो केवळ दुसरा यष्टीरक्षक ठरला आहे. याआधी श्रीलंकेच्या कुमार संगकाराने ही करामत करुन दाखवलेली. संगकाराचा १४ हजार २३४ धावांचा विक्रम मोडणे सध्यातरी धोनीसाठी कठीण दिसत असले तरी या कामगिरीमुळे धोनी १० हजारांचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.