मलकापूरजवळ भीषण अपघात; १३ जण ठार

0

मलकापूर: मलकापूर येथून प्रवासी घेवून जाणाऱ्या महिंद्रा मॅक्झीमो गाडी भरधाव ट्रकखाली आल्याने भीषण अपघात झाला. यात गाडीतील १३ जण जागीच ठार झाले असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. आज दुपारी २.३० वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर मलकापूर शहरापासून जवळच असलेल्या रसोया कंपनीसमोर हा अपघात घडला.

दुपारी मलकापूर येथून अनुराबाद-झोडगाकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या महिंद्रा मॅक्झीमो (गाडी क्र. एम.एच.४६ एक्स ७९२५) या गाडीतून १५ प्रवासी निघाले होते. दरम्यान रसोया कंपनीजवळ मुक्ताईनगरकडून अकोलाकडे जाणाऱ्या ट्रकचे (एम.एच. ४० बी.जी ९११२) समोरचे टायर फुटल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रकने महिंद्रा मॅक्झीमो गाडीला चिरडले.

मृतांमध्ये मॅक्झीमोचालक अनिल मुकुंद ढगे (४०) रा.अनुराबाद, छाया गजानन खडसे ( ३७) रा.अनुराबाद, अशोक लहू फिरके (५५) रा. अनुराबाद, नथ्थू वामन चौधरी (४५) रा. अनुराबाद, आरती, रेखा, सोयीबाई छगन शिवरकर (२९) रा. नागझरी, बऱ्हाणपूर, विरेन ब्रिजलाल मिळवतकर ( ७) रा. नागझरी बऱ्हाणपूर, सतीष छागन शिवरकर (३), मीनाबाई बिलोरकर, किसन सुखदेव बोराडे रा. अनुराबाद, प्रकाश भारंबे रा. जामनेर रोड भुसावळ, मेघा प्रकाश भारंबे यांचा समावेश आहे तर जखमींमध्ये गोकुळ भालचंद्र भिलवसकर (३०) रा. नागझरी जि. बऱ्हाणपूर, छगन राजू शिवरकर (२६) रा. नागझरी जि. बऱ्हाणपूर, रोहीत नथ्थू चौधरी रा.अनुराबाद यांचा समावेश आहे.

आजचा दिवस महाराष्ट्रासाठी घातवार ठरला आहे. कारण रात्री १२ वाजता वणी येथे झालेल्या अपघातात 4 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.