मल्ल्याला ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ जाहीर करण्याबाबत आज फैसला?

0

मुंबई-भारतातील बँकांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याला फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्यासंदर्भात मुंबईतील न्यायालय आज निकाल देण्याची शक्यता आहे. न्यायालयाने मल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केल्यास त्याची संपत्ती जप्त करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

मोठे आर्थिक घोटाळे, बँकांची फसवणूक यांसारखे मोठे आर्थिक गुन्हे उघडकीस आल्यास गुन्हेगार परदेशामध्ये पलायन करतात. अशा देशांकडून त्यांचे प्रत्यार्पण होणे, त्यानंतर खटले चालविणे यामध्ये खूप वेळ वाया जातो. अशा घोटाळेबाजांवर वचक निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने ‘फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, २०१८’ आणला आहे. या कायद्याअंतर्गत फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून जाहीर झाल्यास गुन्हेगाराच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करण्याचा मार्ग मोकळा होतो.

मल्ल्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाईचा बडगा उगारला असून ईडीला मल्ल्याची मालमत्ता जप्त करायची आहे. यासंदर्भात ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) स्थापन केलेल्या विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर आज न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कर्जबुडवे तसेच आर्थिक गैरव्यवहार करणारे २७ व्यावसायिक गेल्या पाच वर्षांत भारताबाहेर गेले असल्याची माहिती शुक्रवारी संसदेत सरकारच्या वतीने देण्यात आली. देशाबाहेर गेलेल्या २७ कर्जबुडव्या व्यावसायिकांपैकी २० उद्योजकांविरुद्ध इंटरपोलने नोटिस बजाविली आहे. आर्थिक गैरव्यवहाराचा तपास करणाऱ्या सक्तवसुली संचलनालयाने २७ पैकी ७ उद्योजकांविरुद्ध कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू केल्याचेही सांगण्यात आले. ब्रिटनद्वारे भारतात हस्तांतरित करावयाच्या किंगफिशर एअरलाईन्सचे विजय मल्या यांच्या प्रक्रियेबाबतही कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. हिरे व्यापारी निरव मोदीबद्दल मात्र काहीही सांगण्यात आले नाही.