भाजपकडून गल्लीच्छ राजकारण; ममता बॅनर्जींनी मोदींच्या शपथविधीला जाण्याचा निर्णय बदलला

0

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा दारूण पराभव करत भाजपप्रणीत एनडीएने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. ३० रोजी नवीन सरकारचा शपथविधी होणार आहे. मोदी यावेळी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. दरम्यान या शपथविधी सोहळ्याला कोण-कोण उपस्थित राहणार याबाबत चर्चा सुरु आहे. याबाबत काल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी मी मोदींच्या शपथविधीला जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता त्यांनी मोदींच्या शपथविधीला न जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

भाजपकडून पश्चिम बंगालमधील हिंसाचारात ५४ जणांचे जीव गेल्याचे आरोप केले जात आहे. भाजपकडून केले जात असलेले आरोप मी माध्यमांतून पहिले. भाजपने केलेले आरोप हे खोटे असून मी मोदींच्या शपथविधीला जाणार नाही असे ममता बॅनर्जी जाहीर केले आहे. काही तासापूर्वी मी मोदींच्या शपथविधीला जाण्याचा निर्णय घेतला होता, मात्र आता मी हा निर्णय बदलला आहे असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालचे राजकारण संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला होता. याठिकाणी भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसमधील संघर्ष टोकाला गेल्याचे पाहायला मिळाले. भाजपने मोदींच्या शपथविधीला पश्चिम बंगालमधील हिंसाचारात जखमी झालेल्या कुटुंबियांना निमंत्रित करण्यात आले आहे.