ममता बॅनर्जी आंदोलनावर ठाम; विरोधकांचा एकसुरात पाठींबा !

0

कोलकाता-कोलकात्यात रविवारी संध्याकाळी सीबीआय विरुद्ध स्थानिक पोलिसांमध्ये वाद उफाळून आला. त्यानंतर मोदींविरोधात एल्गार पुकारत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ‘संविधान बचाव’ची घोषणा करीत धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. ममतांच्या या भुमिकेला विरोधकांनीही पाठींबा दिला असून आज विरोधी पक्षातील मोठे नेते कोलकात्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल आणि आम आदमी पार्टीने एका सुरात मोदी सरकारवर हल्लाबोल करीत ममता बॅनर्जींचे समर्थन केले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आरजेडी नेता तेजस्वी यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला, बसपा अध्यक्षा मायावती तसेच सर्वच विरोधीपक्षांनी ममतांशी फोनवरुन बोलणे झाले असून त्यांच्याबरोबर असल्याचे जाहीर केले आहे.

मोदी आणि शाह यांनी सार्वजनिकरित्या ममतांना सीबीआय कारवाईची धमकी दिली होती त्यानंतर २४ तासांतच हे नाट्य घडले.

अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत, मोदी-शाहच्या जोडीचे काम हे विचित्र आणि लोकशाहीविरोधी आहे. दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी मोदी-शाह हे देशाच्या लोकशाहीसाठी घातक असल्याचे म्हटले आहे.

आरजेडी नेते लालू प्रसाद यादव यांनी भाजपावर निवडणुका जिंकण्यासाठी देशाला अंतर्गत युद्धात ढकलण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला आहे. तर त्यांचे पुत्र आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी देखील मोदी सरकारवर विरोधकांवर जाहीर अजेंडा सुरु केला असल्याचा आरोप केला. तेजस्वी यांनी धरणे आंदोलनाला बसलेल्या ममत बॅनर्जींसोबत फोनवरुन बोलणे केले तसेच आरजेडीचा त्यांना पाठींबा असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी ट्वीट करुन सांगितले की, ते सोमवारी कोलकात्याला जाणार आहेत.

तसेच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी देखील ट्विट करीत केंद्र सरकारवर सीबीआयचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप केला.