आजपासून ‘मन की बात’च्या दुसऱ्या भागाला सुरुवात !

0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर आज पहिल्यांदाच त्यांच्या दुसऱ्या सरकारच्या कार्यकाळातील ‘मन की बात’ कार्यक्रम होणार आहे. दरमहिन्याच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधत असतात.

आजपासून ‘मन की बात’च्या दुसऱ्या मालिकेतील पहिला भाग प्रसारित होणार आहे. देशात नवे सरकार स्थापन होऊन नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पुन्हा हा कार्यक्रम सुरु करण्यात येत आहे. मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर या कार्यक्रमाचे ५३ भाग प्रसारित झाले होते. मोदींच्या पहिल्या कार्यकाळातील अखेरचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम २४ फेब्रुवारी रोजी प्रसारित करण्यात आला होता.

‘मन की बात’मधून जनतेचे प्रश्न आणि या प्रश्नांसंबंधीच्या संकल्पनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे विचार मांडत असतात. त्यासाठी तुमच्या कल्पना शेअर करण्याचे निमंत्रण त्यांनी यापूर्वीच सोशल मीडियाद्वारे केले होते. यासाठी फोन लाईन्स ११ जून ते २६ जून या काळात खुल्या होतील असे सांगण्यात आले होते, आणि त्यावर जनतेला माहिती देण्याचे आवाहन केंद्र सरकारच्यावतीने करण्यात आले होते. आता दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पहिलाच ‘मन की बात’ कार्यक्रम असल्याने मोदी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.