जळगावच्या वडनगरीत लाखो शिवभक्तांची मांदियाळी

‘श्री शिवाय नमस्तूभ्यंम’ नामाचा गजर : संपूर्ण जिल्हात ’शिवमय’ वातावरण

जळगाव – शहरापासून नजीकच असलेल्या वडनगरी फाटा येथील बडे जटाधारी महादेव मंदिराच्या परिसरात लाखो शिवभक्तांची मांदियाळी दिसून येत आहे. येथील अनेक एकराच्या परिसरात सिंहोर येथील पंडीत प्रदिप मिश्रा यांच्या मधूरवाणीतून शिव महापुराण कथेचेे आज पासून आयोजन करण्यात आले आहे.
कथा सुरू होण्याच्या दोन दिवस आधीपासूनच शिवभक्तांचे कथास्थळी आगमन होण्यास प्रारंभ झाला होता. किमान सात लाख भाविकांची या कथेचा लाभ घेण्यासाठी उपस्थिती राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. प्रत्यक्ष कथेला आज सुरूवात होणार असल्याने पहाटे पासूनच कानळदा रोड वर भक्तांचे जथ्थेच्या जथ्थे कथा स्थळी जातांना दिसत होते. यात महिला भक्तांचा सहभाग लाक्षणीय होता हे विशेष. जळगाव जिल्ह्यातील एसटीच्या प्रत्येक आगारातून कथा स्थळी जाण्यासाठी २०० पेक्षा जास्त बसेसची व्यवस्था करण्यात आली असली तरी भक्तांची गर्दी पहाता ही व्यवस्था सुघ्दा कमी पडत असल्याचे चित्र आहे. रेल्वेस्थानकांवर येणार्‍या प्रत्येक गाडीतून शेकडो शिवभक्तांचा जथ्था उतरत असून प्रत्येकाची पाऊले कथास्थळाकडे वळत आहेत. भक्तांची गैरसोय होवू नये म्हणून रेल्वेस्टेशन, बसस्थानकासह जळगाव शहरातील प्रत्येक चौकाचौकात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाहेरील जिल्ह्यातून येणार्‍या भक्तांना जागोजागी पोलिस, गृहरक्षक दलाचे जवान अतिशय नम्रपणे मार्गदर्शन करतांना दिसत आहेत. प्रत्येकाच्या तोंडी ‘श्री शिवाय नमस्तूभ्यंम’ नामाचा गजर सुरू असून जळगाव शहरासह संपूण जिल्हाच शिवमय झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.