पिंपरी-चिंचवड :- निर्मलाताई कुटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित आंबा महोत्सवाचे उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील विविध भागामध्ये या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शेतक-यांचा आंबा थेट ग्राहकांना
महापालिकेच्या रोज लँड सोसायटी शेजारील मैदानात हा महोत्सव भरविण्यात आला असून पिंपळे सौदागरमध्ये हा महोत्सव ३० जूनपर्यंत सुरू राहणार आहे. उद्घाटनानंतर आमदार लक्ष्मण जगताप यांनी सर्व आंबा विक्री स्टॉलवर जाऊन शेतक-यांशी चर्चा केली. यावेळी जगताप म्हणाले की, कोकणातील कष्टकरी शेतक-यांनी पिकवलेल्या आंब्याला या महोत्सवामुळे चांगला बाजारभाव मिळणार आहे. तसेच शेतक-यांचा आंबा थेट ग्राहकांना दिल्याने परिसरातील नागरिकांना नक्कीच स्वस्त आणि चांगल्या दर्जाचा आंबा मिळणार आहे. निर्मला कुटे यांनी आयोजित केलेल्या या आंबा महोत्सव शेतकरी तसेच नागरिकांच्या फायद्याचाच ठरणार असून जास्तीस जास्त नागरिकांनी येथे भेट देऊन आंबा खरेदी करावे असे आवाहन केले.
आंबा महोत्सवाचे आयोजन
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीने उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या योजने अंतर्गत आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते. पिंपरी-चिंचवड शहरात पणन मंडळाच्या पुणे विभागीय कार्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील मैदानात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन महापौर नितीन काळजे यांनी केले. महोत्सवामध्ये 20 स्टॉल उभारण्यात आले असून कोकणातील 24 आंबा उत्पादक शेतकरी आंबा विक्री करणार आहेत. हा महोत्सव 14 मे पर्यंत सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत सुरु राहणार आहे. आंबा महोत्सवात नैसर्गिक रित्या पिकवलेला व खात्रीशीरपणे कोकणात उतादित झालेला आंबा योग्य दरात विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असून या संधीचा लाभ नागरिकांना घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांनी केले आहे.
यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका सुनिता तापकीर, जयनाथ काटे, बबनराव झिंजुर्डे, शेखर कुटे, स्वीकृत नगरसदस्य संदीप नखाते, अरुण चाबुकस्वार, अनिल नखाते, भानुदास काटे, वाल्मिक कुटे, चंदा भिसे, संजय भिसे, सुप्रिया पाटील, संजय कुटे, ज्येष्ठ नागरिक व समस्त ग्रामस्त उपस्थित होते.