पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री, माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या पणजी मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी भाजपने सिध्दार्थ कुंकळ्येंकर यांना उमेदवारी दिली आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांना तिकीट नाकारण्यात आली. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या सोमवारी २९ रोजी दुपारी ३ वाजता संपत आहे. कुंकळ्येंकर हे उद्या अर्ज भरणार आहे.
पणजी मतदारसंघात २४ वर्षे आमदार राहिलेले माजी मुख्यमंत्री दिवंगत पर्रीकर यांच्या निधनाने ही जागा रिकामी झाली होती. पर्रीकर यांनी मध्यंतरी केंद्रात संरक्षणमंत्रीपद भूषविलेले होते. त्यांचा पुत्र उत्पल आणि माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येंकर अशी दोन नावे भापजच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे गेले होती. पर्रीकर यांच्या निधनाने निर्माण झालेल्या सहानुभूतीचा लाभ उठविण्यासाठी भाजप उत्पल यांना तिकीट देईल, अशी चर्चा होती. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यास अवघे काही तास राहिले असताना आज सायंकाळी उशिरा कुंकळ्येंकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आले.
सिध्दार्थ कुंकळ्येंकर हे पणजी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आलेले आहेत. पर्रीकर केंद्रात संरक्षणमंत्रीपदी गेले तेव्हा पणजीची जागा रिकामी झाली व २0१५ मध्ये भाजपतर्फे सिध्दार्थ रिंगणात उतरले. सुरेंद्र फुर्तादो हे त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार होते. सिध्दार्थ यांना ९,९८९ तर फुर्तादो यांना ४६२१ मतें मिळाली आणि सिध्दार्थ निवडून आले. २0१७ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे सिध्दार्थ आणि युनायटेड गोवन्स पक्षातर्फे बाबुश मोन्सेरात यांच्यातच खरी लढत झाली व त्यावेळीही सिध्दार्थ निवडून आले. बाबुश यांना ६८५५ मतें मिळाली तर सिध्दार्थ यांना ७९२४ मतें प्राप्त झाली. १0३९ अधिक मतें मिळवून सिध्दार्थ विजयी ठरले.