नवी दिल्ली: मान्सून अखेर भारतात दाखल झाला असून आज शनिवारी मोसमी वारे अंदमानमध्ये दाखल झाले आहेत. केरळमध्ये मान्सूनचे आगमन ६ जून रोजी होण्याची शक्यता असून यंदा केरळमधील मान्सूनच्या आगमनाला पाच दिवस विलंब होणार आहे. भारतीय हवामान विभागाने नुकताच मान्सूनसंदर्भात अंदाज वर्तवला होता. नैर्ऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यास परिस्थिती अनुकूल असून अंदमान निकोबार बेटांवर तसेच शेजारच्या आग्नेय बंगाल उपसागरात १८-१९ मे रोजी तो दाखल होईल, असा अंदाजात म्हटले होते. यानुसार शुक्रवारी मान्सूनचे अंदमानमध्ये आगमन झाले आहे.
यंदा मोसमी पाऊस हा ९६ टक्के या दीर्घकालीन सरासरीइतका असेल. सरासरीच्या खाली व सरासरी या दोहोंच्या मध्ये तो या वेळी असण्याची शक्यता आहे. स्कायमेटने मात्र या वेळी सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९३ टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. गेल्या वर्षी मोसमी पाऊस २९ मे रोजी केरळात आला होता, त्या वेळी तो नेहमीच्या १ जून या तारखेपेक्षा तीन दिवस अगोदर आला. तरी पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला होता. २०१७ मध्ये मोसमी पाऊस ३० मे रोजी केरळात आला होता पण त्या वेळी पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या ९५ टक्केच होता. याचा अर्थ तेव्हाचा पाऊसही सरासरीपेक्षा कमी होता.