मराठा समाजाची सरकार विरोधात नाराजी

0

मुंबई – मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, मराठा क्रांती मोर्चाने सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मराठा समाजाच्या सवलती संदर्भात सरकारने काढलेले आर्थिक मागास प्रवर्गाचे अध्यादेश मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी फाडले. यावेळी कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला. आरक्षणाच्या मुद्यावर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राज्य पातळीवरील कार्यकर्त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधी तीव्र नाराजी व्यक्त केली.

समाजाच्या सवलतीसाठी सरकारने आर्थिक मागास प्रवर्गात योजना जाहीर केल्या आहेत. त्या अधिसूचनेत मराठा समाजाचा उल्लेख करण्यात आला नाही. या योजना बोगस असल्याचा आरोप करत यावेळी कार्यकर्त्यांनी आर्थिक मागास प्रवर्गाचे जीआर सामूहिकरित्या फाडले. राज्यभरात मराठा समाजाचे ५८ मोर्चे शांततेत निघाले. मुंबईच्या ९ ऑगस्ट २०१७ च्या शेवटच्या मोर्च्यात सरकारने काही मागण्या मान्य केल्या.

त्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडून एक महिन्याचा कालावधी घेण्यात आला. पण आज १० महिने झाले तरी आरक्षणाच्या मुख्य मागणीवर काहीही निर्णय होत नाही. आतापर्यंत मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलन केले आहे. मात्र यापुढे तीव्र आणि उग्र संघर्ष होईल असा इशाराही यावेळी मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वय समितीचे आबासाहेब पाटील यांनी दिला.

राज्यात ३४ टक्के मराठा समाज आहे, एवढी मोठी ताकद असताना सरकार दुर्लक्ष करत आहे. फडणवीस यांना पुन्हा निवडून यायचे असेल तर त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असेही पाटील यावेळी म्हणाले. तर मराठा आरक्षणासंदर्भात स्थापण्यात आलेल्या उपसमितीचे प्रमुख महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे मराठा समाजात फूट पाडत आहेत, असा आरोपही यावेळी त्यांनी केला. दिवंगत अण्णासाहेब पाटील माथाडी महामंडळाचा किती तरुणांना लाभ झाला, याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी द्यावी अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.