कोल्हापूर-मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटना दुरूस्ती करणे शक्य असल्याने घटना दुरूस्ती करण्याचा निर्णय जर केंद्र सरकारने घेतला तर विरोधकांना त्याची गरज मी समजावून सांगेन अशी भूमिका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतली आहे. घटना दुरूस्ती केली तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते असेही त्यांनी म्हटले आहे. कोल्हापुरातील दसरा चौकात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला शरद पवारांनी हजेरी लावली आहे. त्यावेळी त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारीत साप सोडण्या संदर्भात जे वक्तव्य केले त्यामुळेच मराठा समाजातील आंदोलक अधिक आक्रमक झाले. आंदोलन शांततेत सुरू असताना सत्ताधाऱ्यांनी बेजबाबदार वक्तव्य करून आगीत तेल ओतले अशीही टीका शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा केली. सरकारकडे असलेले रेकॉर्डिंग जाहीर करावे असे आव्हानही शरद पवार यांनी दिले आहे.
लोकसभेचे एकत्र
दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार आहे . लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा चर्चा संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर सुरू होणार आहे. काँग्रेसच्या चर्चेची सूत्रे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे राहतील तर राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्या सहभाग असणार आहे. जागावाटप करताना काही अडचण निर्माण झाल्यास दोन्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अंतिम निर्णय घेतील.