मराठा आरक्षणाच्या बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून अतिरिक्त कुमक

0

मुंबई : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ९ ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या मराठा मोर्चा समन्वय समितीने बंद पुकारला आहे. तरी काही संघटनानी बंद न करता ठिय्या आंदोलन करण्याची भुमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गृह विभागामार्फत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. तसेच केंद्र सरकारकडून अतिरिक्त सुरक्षा पथक राज्यात बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थितीचा आढावा घेतला असून मागील वेळी हिंसक आंदोलने झाली त्या ठिकाणी अतिरिक्त कुमक तैनात केली जाणार आहे. हा बंद शांततेने पार पडावा आणि जनतेच्या जिवीताचे तसेच मालमत्तांचे संरक्षण व्हावे अशा सूचना देण्यात आल्याची माहिती गृह विभागातून देण्यात आली आहे.

मागिल काही दिवसांतील मराठा आंदोलनाचा अनुभव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून काही जणांना आज रात्रीच ताब्यात घेतले जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली असून पोलीस दल सतर्क झाले आहे. ९ ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलात गुप्तवार्ता विभागाच्या माहितीनुसार धोकादायक विभाग आणि व्यक्ति यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असून त्या बाबत माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील स्थानिक पोलीस प्रशासन मराठा मोर्चा समन्वय समितीच्या संपर्कात असून गुरुवारी आंदोलनाला गालबोट लागू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांना देखील शांततेचे आवाहन केले आहे. उद्याच्या आंदोलनासाठी राज्य पोलीस दलातर्फे केंद्र सरकारकडून एकूण १४ विशेष दलांची मागणी करण्यात आली होती. पण हे आंदोलन शांततेत केले जाईल असे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मराठा समन्वय समित्यांकडून सांगण्यात आले असले तरीही केंद्र सरकारकडून ७ विशेष दल महाराष्ट्रात तैनात करण्यात येणार आहेत.

मराठा आंदोलन हिंसक होईल म्हणून केंद्र सरकारतर्फे एकूण १४ विशेष पथके पाठवण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली होती. पण उद्याच्या आंदोलनाला फक्त ७ पथके येणार असल्याची माहिती गृह खात्याच्या सूत्रांनी दिली. या ७ पैकी ६ पथके हे या आरएएफ (रॅपिड अॅक्शन फोर्स) चे असणार आहेत तर एक पथक हे सीआयएसएफचे (सेंट्रल इंडीस्ट्रिअल फोर्स) असणार आहे. एका पथकात जवळपास १०० ते ११० सशस्त्र जवानांचा समावेश असून एकूण ७ पथकांच्या माध्यमातून ८०० जवानांचे सुरक्षा पथक उद्या तैनात असणार आहे. या बरोबरच राज्य राखीव पोलीस दलही बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात येणार असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.