मुंबई-मराठा आरक्षणासाठी भाजपा आमदार डॉ. राहुल आहेर यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. आहेर यांनी मराठा आंदोलकांकडे राजीनामा सोपवला असून समाजाला जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांनी हा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवावा, असे त्यांनी म्हटले आहे. वेळप्रसंगी समाजासाठी बलिदान द्यायलाही तयार आहे, असेही त्यांनी सांगितले.
काकासाहेब शिंदे या आंदोलकाच्या मृत्यूनंतर मराठा आंदोलनाचे स्वरूप तीव्र झाले असून नाशिकमधील चांदवड- देवळा मतदारसंघातील आमदार डॉ. राहूल आहेर यांनी गुरुवारी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. ‘मराठा आरक्षणाच्या मागणीला माझे समर्थन असून मी मराठा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे पदाचा राजीनामा सोपवत आहे. समाजासाठी जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांनी हा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवावा’, असे त्यांनी आंदोलकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर आमदार राहूल आहेर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मराठा आरक्षणासंदर्भात हायकोर्टातून उचित निर्णय मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मराठा समाजाला हक्क मिळालाच पाहिजे, या समाजाला आंदोलनाची वेळ यावी हे दुर्दैव असून मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीत दिरंगाई होत असेल तर सरकारने हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी केली.